नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमध्ये आणखी एक रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की मालगाडीचे १२ डब्बे रुळावरून खाली घसरले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालमधील बांकुडा येथे रविवारी सकाळी ४ वाजता ही घटना घडली. येथील ओंडा स्टेशनवर एक मालगाडी उभी होती. तेव्हा मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने जोरात धडक दिली. या घटनेत मालगाडीचे १२ डब्बे रुळावरून खाली घसरले. यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH | West Bengal: Two goods trains collided at Onda railway station in Bankura. Rail operation on Kharagpur–Bankura–Adra line has been halted. More details awaited. pic.twitter.com/T4sL5rn7Rp
— ANI (@ANI) June 25, 2023
यात मालागाडीचे इंजिन रेल्वे रूळावरून खाली घसरले आहे. एका मालगाडीचे प्रचंड नुकसानही झाल्याचे यामध्ये दिसत आहे. ही मालगाडी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेत रेल्वे चालक जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे मालगाडीचे डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेचा विचित्र अपघात झाला होता. यात २८८ जणांचा मृत्यू, तर एक हजारच्यावर जण गंभीर जखमी झाले होते. अशातच मालगाडीचा हा अपघात घडल्याने रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.