सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचा फेर आढावा घेण्याची वेळ आली आहे : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली – विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, नैतिकता आणि नैतिक मूल्य रुजवण्यासाठी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत बदल करुन तिला ज्ञान आणि संशोधन केंद्र म्हणून स्थापित करण्याची गरज आली आहे, असे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण कायापालट करण्याचे आवाहन त्यांनी केले, जेणेकरुन 21व्या शतकातील वेगाने बदलणाऱ्या गरजांचा सामना करता येईल. ते आज नवी दिल्लीत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या 32 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते.

आपली स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेली प्रमाणपत्र, पदवी आणि पदविकांसाठी स्वत:ला सिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गरीबी, निरक्षरता, भ्रष्टाचार, भेदभाव, उपासमार मुक्त नवीन भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, त्यावर त्यांनी भर दिला. उच्च शिक्षणामुळे जबाबदार व्यक्ती म्हणून परिवर्तन होतांना त्यांच्यात सामाजिक आणि नैतिक मूल्य रुजलेली असायला हवीत, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

ज्ञान आधारीत समाज निर्माण करण्यासाठी भारताचे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था यांची सांगड घालायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ सारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांना माहिती आणि तंत्रज्ञान कौशल्य देखिल शिकवावे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना भविष्यात त्याचा वापर करता येईल, असे आवाहन नायडू यांनी केले. ऑनलाईन शिक्षण ही शिकण्याचे सर्वोत्तम माध्यम असल्याचे सांगून ते म्हणाले की, यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची क्षमता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.