मुंबई – चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत.
काही दिवसांपूर्वी, या चित्रपटाचा दमदार असा टिझर प्रदर्शित झाला होता. हा टिझर पाहिल्यावर तुमच्या ही अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शन टिझर मध्ये दाखविण्यात आले. दरम्यान, नुकतंच ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारखी घोषित करण्यात आली असून, येत्या 27 मे रोजी हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत स्वतःहा प्रवीण तरडे असणार आहेत. तर दुसरीकडे मराठमोळा अभिनेता ‘गश्मीर महाजनी’ छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणार आहे. तर बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल अद्याप कोणताही खुलासा केला नाही.