रोम – जागतिक फुटबॉल क्षेत्रातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या विक्रमी गोलच्या जोरावर युवेन्ट्सने इटालियन सिरीज एक फुटबॉल स्पर्धेचे सलग नववे विजेतेपद निश्चित केले आहे. युवेन्ट्सने सॅम्पोरडिया संघाचा 2-0 असा पराभव केला.
या सामन्यात रोनाल्डोने फ्री किकवर केलेला गोल सर्वात प्रेक्षणीय ठरला. त्याने सलग 30 सामन्यांत गोल करण्याचीही कामगिरी केली असून त्याने या स्पर्धेच्या इतिहासातीलही 30 वा गोल नोंदवला. या सामन्यातील विजयासह युवेन्ट्सने 83 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेत या स्पर्धेचे सलग नववे विजेतेपद निश्चित केले असून साखळीतील दोन सामने अद्याप बाकी आहेत.
फेलिस बोरेइने युवेन्ट्सकडून खेळताना 31 गोल नोंदविण्याची कामगिरी केली होती. या कामगिरीची बरोबरी करण्यासाठी रोनाल्डोला केवळ एका गोलची तर सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर नोंदविण्यासाठी दोन गोलची आवश्यकता आहे. या सामन्यात रोनाल्डोने पहिल्या हाफमधील 7 मिनिटांच्या वाढीव वेळेत मिळालेल्या फ्री किकचे रूपांतर गोलमध्ये केले व संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर सॅम्पोरडियावर वर्चस्व राखताना फेडरिको बोनेर्डने 67 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. यानंतर उर्वरित खेळात सॅम्पोरडिया संघाला गोल करण्याची संधीच युवेन्ट्सने दिली नाही व सामना सहज जिंकला.