येरवडा प्रशासनाने दिले 3 स्मार्ट फोन आणि 6 कॉनईनबॉक्स उपलब्ध
पुणे – करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली कारागृहातील कैदी-वकिलांची मुलाखत आता व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातुन सुरू करण्यात आली आहे. यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने 3 स्मार्ट फोन आणि 6 कॉईनबॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत खटल्याची स्थिती, आपल्या पक्षकाराला कायदेशीर सल्लासाठी “वकिल-कैदी’ मुलाखत महत्वाची असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 मार्चपासून प्रत्यक्ष मुलाखत बंद आहे. याबाबात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
राज्यातील सर्व कारागृह प्रशासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंगचा वापर करत वकील आणि कैदी यांच्यात बोलणे होण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आदेश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले होते. त्यानुसार येरवडा कारागृहात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वकिलांना कैद्याच्या भेटीसाठी कारागृह विभागाच्या संकेस्थळावरून yerwadacp1871@gmail.com मेल हे ईमेल अकाऊंट तयार करण्यात आला आहे. या मेल अकाऊंटवर वकिलामार्फत नावनोंदणी केल्यानंतर त्यांना व्हिडोआ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.