दौंड तालुक्‍यासाठी स्वतंत्र प्रांतकार्यालय मंजूर

राहुल कुल ः राजपत्रही प्रसिद्ध झाले असल्याची घोषणा

दौंड- दौंड तालुक्‍यासाठी स्वतंत्र प्रांतकार्यालय मंजूर झाले असून, त्याचे राजपत्रही प्रसिद्ध झाले असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना कुल पुढे म्हणाले की, स्वतंत्र प्रांत कार्यालयासाठी राज्य सरकारने राजपत्र आज प्रसिद्ध केले आहे. या सरकारच्या पंचवार्षिकमध्ये राज्यातील तालुक्‍यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालयाचा हा पहिलाच निर्णय असल्याचे ते म्हणाले. या प्रांत कार्यालयाचे मुख्यालय दौंड हेच असणार आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महसूल विभागाने नकारात्मक अहवाल सादर केला असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष बाब म्हणून दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय करण्याचा निर्णय घेतला आहे.

आघाडी सरकारच्या काळात दोन तालुक्‍यांसाठी एक प्रांत कार्यालय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दौंड आणि पुरंदर या तालुक्‍यांसाठी कार्यालय मंजूर झाले; परंतु या कार्यालयाचे मुख्यालय पुण्यात ठेवण्यात आले, त्यामुळे या निर्णयाला आम्ही आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दौंड किंवा पुरंदरमध्ये हे कार्यालय सुरू करावे, असा निर्णय दिला. मागील आघाडी सरकारमध्ये तत्कालीन दौंडचे आमदार सत्ताधारी होते व पुरंदरचे आमदार विरोधी पक्षात होते तरी देखील हे प्रांत कार्यालय पुरंदर येथे करण्यात आले. दौंड तालुक्‍यातील जनतेच्या दृष्टीने हे प्रांत कार्यालय अडचणीचे होते, म्हणून प्रांत कार्यालय दौंडला आणण्यासाठी सभागृहात देखील मागणी केली, तसेच शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. महसूल विभाग नकारात्मक असताना देखील महसूलमंत्री व मुख्यमंत्र्यांनी या कार्यालयास हिरवा कंदिल दाखवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)