मुंबई – शिवसेनेची (शिंदे गट) सर्व वृत्त पत्रातील पहिल्या पानावर एक जाहिरात छापून आली होती. ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या जाहिरातीमध्ये “राष्ट्रामध्ये मोदी अन् महाराष्ट्रामध्ये शिंदे” अशा आशयाचा मजकुर छापून आला होता. यावरून विरोधकांसह भाजप नेत्यांनी देखील शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली. भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.
“बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही,” अशा शब्दांत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले म्हणाले की, “काही वेळा पूर्वीच माझी उपमुख्यमंत्र्यांबरोबर याबद्दल चर्चा झाली. त्यांनी तिथूनच त्या लोकांना फोन करून काय सांगायचंय ते सांगितलं आहे. त्यामुळे आता आम्ही जास्त खोलात शिरणार नाही. मात्र वरच्या स्तरावर याचा विचार केला जाईल. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल.”
नेमकं काय म्हणाले होते अनिल बोंडे ?
अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत म्हंटले होते की, “बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेने त्यांना स्वीकारले आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील, असं मला वाटत आहे. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही.”
“उद्धव ठाकरेंना वाटत होतं की, मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथ शिंदेंना वाटायला लागलं की, ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. पुढच्या काळात शिवसेनेला वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचं आणि जनतेचं मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही,” असेही अनिल बोंडे म्हणाले होते.