मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. येत्या १६ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या यशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास ट्वीट केले आहे. सोबतच त्यांनी आदिपुरुषचा ट्रेलर पाहतानाचा फोटो देखील शेअर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत लिहिले की, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर आदिपुरुष प्रभू श्रीराम यांची कृपा व्हावी ही प्रार्थना. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा!” याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरील वादावर देखील ट्वीट केले होते. यातून त्यांनी या चित्रपटात वास्तव मांडण्यात आल्याचा दावा केला होता.
त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘सावरकर’ या चित्रपटासाठीही फडणवीसांनी सावरकर जयंतीच्या दिवशी ट्वीट केलं होतं. आता आदिपुरुषसाठी फडणवीसांनी ट्वीट करत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून फडणवीस काही चित्रपटांबाबत ट्वीट करताना दिसून येत आहे.
🏹May the #ADIPURUSH Prabhu Shri Ram bless the much awaited film ‘Adipurush’ based on MaryadaPurshottam Prabhu Shri Ram’s life.
Wishing the directors, producers and team #Adipurush a chartbuster success !@manojmuntashir pic.twitter.com/T5xBLBw8MR— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2023
आदिपुरुष चित्रपट वाद
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला तेव्हा बराच वाद झाला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या VFX ची लोकांनी खूप चर्चा केली होती. त्यानंतर त्याचे प्रदर्शनही काही काळ पुढे ढकलण्यात आले. आता निर्मात्यांनी निवेदन जारी करत चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट आता १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या आणि क्रिती सेनॉन सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सैफ अली खान रावणच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.