मुंबई – आरोपी अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथे घेऊन जाताना हा हल्ला करण्यात आला आहे. सध्या या घटनेची देशभरात चर्चा होत आहे. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
स्वराने ट्वीटमध्ये लिहिले की, “अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही आनंद व्यक्त करण्यासारखी गोष्ट नाही. हे अराजकतेचे लक्षण दर्शवते. राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत, त्यांना सक्षम करत आहेत हे यातून दिसून येते. हे कठोर शासन नाही, तर ही अराजकता आहे.” तिच्या या ट्वीटवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
An extra judicial killing or an encounter is not something to be celebrated. It signals a state of lawlessness. It signals that the State agencies have depleted credibility because they are acting like or enabling criminals. This is not strong governance, this is anarchy.
— Swara Bhasker (@ReallySwara) April 15, 2023
नेमकं काय घडलं?
गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असताना हत्या करण्यात आली. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. यानंतर तीनही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.