मुंबई – अतिक अहमद आणि भाऊ अशरफ अहमद या दोन्हही गँगस्टरची पोलीस बंदोबस्तामध्ये हत्या झाल्याची घटना घडली. दोघेही भाऊ माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला करून गोळ्या झाडल्या या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. उत्तप्रदेशमध्ये घडलेल्या या खळबळजनक घटनेबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. पोलीस बंदोबस्तात झालेली ही हत्या गंभीर बाब आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
“मेडिकल कॉलेजच्या समोर पोलिसांच्या घेऱ्यामध्ये हत्या होते. पोलिसांच्या घेऱ्यात हत्या होते हे कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे” असं संजय राऊत यांनी म्हंटल. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी यूपीतील हत्येबाबत भाष्य केलं.
राऊत पुढे म्हणाले,”पोलिसांच्या इन्काउंटरबाबत आम्ही कधीही प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं नाही. गुंडगिरी मोडून काढणायसाठी मुंबई महाराष्ट्रात सुद्धा एन्काउंटर झालेत युपीमध्ये सुद्धा झालेत कायदा सुव्यवस्था राखण्याचा तो एक विषय असतो. पण जेव्हा कडेकोट बंदोबस्तामध्ये घुसून गुंड असेल माफिया असेल अन्य कोणी असेल यांची हत्या होते तेव्हा सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात” असं स्पष्ट मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
काय घडलं नेमकं
गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असताना हत्या करण्यात आली. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. यानंतर तीनही हल्लेखोरांनी देखील सरेंडर केलं.