नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गँगस्टर अतिक अहमद याच्या खात्म्यानंतर देशात खळबळजनक उडाली आहे. गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ अहमद या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. हल्लेखोरांनी अतिकला संपवून आत्मसमर्पण केले, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे उत्तर प्रदेशचे योगी सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. तसेच संपूर्ण प्रयागराजमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिक अहमद आणि अशर्रफ अहमद यांच्या हत्येनंतर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अतिक आणि अशर्रफ यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले १७ पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. तसेच प्रयागराजमधील शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह कलम १४४ लागू शांतता राखण्यासाठी किंवा कोणतीही आणीबाणी टाळण्यासाठी हे कलम लागू करण्यात आले आहे. तसेच पोलिसांची सुट्टीदेखील रद्द करण्यात आली आहे. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच उत्तर प्रदेशमधील सर्व स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्या पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या परिसरात जाण्यास सांगण्यात आले आहे. यूपीमध्ये पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवर गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परत बोलावले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य सचिव विशेष विमानाने प्रयागराजला जाणार आहेत.
दुसऱ्या बाजूला, प्रयागराजमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे लखनौ आयुक्तालय पोलीस सतर्क झाले आहेत. अतिरिक्त पोलीस उपायुक्त चिरंजीव नाथ सिन्हा हे सकाळी जुन्या लखनौच्या हुसैनाबादमध्ये पायी गस्त घालताना दिसले. तसेच त्यांनी सामान्य नागरिकांशी बातचित केली, गर्दी करू नका अशा सूचना त्यांनी लोकांना दिल्या. घाबरू नका असे सांगून लोकांना आश्वस्त केले. यासह त्यांनी संपूर्ण परिसरातील एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला.