पुणे – गेल्या 13 वर्षांपासून मी बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. लोकांच्या विश्वासवरच मी खासदार असून, मी गेल्या 13 वर्षांत केलेले काम माझ्या सोशल मीडियावर सर्वांना पाहायला मिळेल. मी नेहमीच मतदारसंघात भेटी देत असते. समस्या जाणून घेत असते. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री येणार असल्याने मी मतदारसंघात फिरत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
खासदार सुळे यांनी मतदारसंघातील वारजे, खडकवासला, धनकवडी परिसरातील समस्यांबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या की, केंद्रीय अर्थंमत्री येणार असल्याने मी मतदारसंघात फिरते या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही.
मी गेल्या 13 वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. खासदार म्हणून मी जे काही काम केले आहे, ते माझ्या सोशल मीडियावर सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. तसेच, आपला खासदार काय करतो, कुठे आहे याची माहितीही मतदारांना असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी माहिती टाकते. त्यामुळे मी मतदारसंघात फिरत नाही, मतदारसंघाचा विकास झाला नाही, यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्या म्हणाल्या.
बारामतीत अनेक केंद्रीय संस्था असून, त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रपतींपासून, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री बारामतीत आले आहेत. बारामती परिसरातील सहकार चळवळीच्या कामाची रिझर्व्ह बॅंकेनेही दखल घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्री बारामतीत येणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा मी स्वत: त्यांची भेट घेऊन या प्रकल्पांना भेट देण्याची विनंती केली. मात्र, आपण संघटनात्मक दौऱ्यावर असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. मात्र संघटनेच्या कामातून थोडा वेळ त्यांनी बारामतीसाठी द्यावा, अशी मी त्यांना विनंती केली असल्याचेही सुळे यांनी सांगितले.
पाणी, कचऱ्याच्या समस्येवर बोट
अद्याप पालकमंत्र्यांची नियुक्ती नसल्याने अनेक महत्वाचे प्रकल्प तसेच विकासकामांचा आढावा घेतला जात नाही. त्यामुळे हे प्रकल्प रखडले असल्याचा आरोप सुळे यांनी केला. वारजे, खडकवासला भागात पाणी कमी दिले जात असून, कचऱ्याची समस्या वाढली आहे. एरवी नगरसेवक असताना या समस्यांकडे ते लक्ष देतात. मात्र, आता नगरसेवक नसल्याने महापालिका आयुक्तांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली असल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.