पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून आठ उमेदवारांनी सोमवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून या मतदारसंघातून एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार आहे. नणंद -भावजय यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बारामती मतदारसंघासाठी मतदान दि.7 मे रोजी होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीमध्ये 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रामुख्याने सुळे यांच्या वतीने डमी उमेदवार म्हणून सचिन दोडके यांनी अर्ज भरला होता. दोडके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एकूण आठ उमेदवारांना अर्ज मागे घेतले. तर, आता बहुजन समाज पार्टीकडून प्रियदर्शनी कोकरे आदींसह 38 उमेदवार आहेत.
एका बॅलेट युनिटवर १६ बटणांची मर्यादा
ईव्हीएमवरील बॅलेट युनिटवर 16 उमेदवारांसाठीच बटणाची मर्यादा आहे. एक बटण हे “नोटा’ मतासाठी असते. त्यामुळे जर15 उमेदवार रिंगणात असतील, तर एकच बॅलेट युनिट वापरावे लागते. आता बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार निवडणुक लढविणार असल्याने तीन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहे. त्यामुळे मतदानासाठी तीन बॅलेट युनिटवरील उमेदवारांची नावे व चिन्हे पाहून मतदारांना मतदान करावे लागणार आहे.