नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने बुधवारी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. त्यामुळे त्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक 18 जुलैला होणार आहे. त्यासाठी 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकणार आहेत. त्या अर्जांची छाननी 30 जूनला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 2 जुलै आहे. प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास 18 जुलैला मतदान, तर 21 जुलैला मतमोजणी होईल.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला समाप्त होणार आहे. त्याआधी नव्या राष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवडून गेलेले सदस्य, राज्य विधानसभांवर निवडून गेलेले सदस्य राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदार असतील.
संसदेतील आणि विधानसभांमधील नामनियुक्त सदस्य मतदानासाठी पात्र नाहीत. विधान परिषदांमधील सदस्यही राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदार नाहीत. त्या निवडणुकीसाठी संसद आणि विधानसभांमध्ये मतदान होईल.