लीमा – भारताची अव्वल महिला नेमबाज मनू भाकरच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारतीय नेमबाजांनी आयएसएसफ ज्युनियर विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत वर्चस्व राखताना अव्वल स्थानही मिळवले. भारताच्या खेळाडूंनी एकूण 6 सुवर्णपदकांपैकी 4 सुवर्ण पदकांना गवसणी घातली.
शनिवारी दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने अव्वल स्थान मिळवताना पहिल्या स्थानावरील अमेरिकेला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 14 पदके जिंकली आहेत. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून खेळाडूंनी अमेरिकेचे वर्चस्व गाजवले. भारताच्या पुरुष खेळाडूंनी 10 मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
सुवर्णपदकासह भारताने 6 रजत व 2 ब्रॉन्झपदकेही मिळवली आहेत. भाकरने रविवारी एकाच दिवसात 2 सुवर्णपदकांची कमाई केली. या दोन पदकांसह तिने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 3 पदके मिळवली आहेत. तिने यापूर्वी संयुक्त सांघिक गटात रिदम सांगवान व शिखा नारवाल यांच्यासह 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
रविवारी भारताने सुवर्णपदकाच्या सामन्यात बेलारूसचा 16-12 असा पराभव केला. महिला गटासह नवीन, सरबजोत सिंह आणि शिव नरवालच्या पुरष संघानेही बेलारूसला 16-14 असे पराभूत करताना सुवर्णपदक मिळवले. तसेच पुरुषांच्या संघाने 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण तर, महिलांच्या संघाने याच गटात रजतपदक जिंकले.