अग्रलेख : शाळेची घंटा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात निर्णय घेतल्याप्रमाणे आज 4 ऑक्‍टोबरपासून राज्यात ग्रामीण भागात इयत्ता 5वी ते 12वी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये पुन्हा एकदा घंटा वाजणार आहे. पण त्याच वेळी काही पालक संघटनांनी शाळा सुरू करण्यास घेतलेल्या आक्षेपांचा विचार केला, तर करोना महामारीच्या परिस्थितीतील संकटाबाबत संभाव्य धोक्‍याच्या घंटेचाही विचार करावा लागणार आहे. 

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवहार संपूर्णपणे बंद होते. जरी परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी या कालावधीत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था संपूर्णपणे ऑनलाइन माध्यमातूनच सुरू होती. या कालावधीत दहावी आणि बारावीच्या परीक्षाही नेहमीच्या पद्धतीने होऊ शकल्या नाहीत. 

विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीवर आधारित दहावी आणि बारावी या इयत्तांमध्ये उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारची नाराजी, निराशा आणि मरगळ आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजणार असल्याने शाळांची आवारे गजबजणार आहेत. सरकारने शाळा सुरू करण्याबाबत जी नियमावली प्रसिद्ध केली आहे त्याच्या आधारे स्थानिक प्रशासनाने निर्णय घेऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. 

साहजिकच महाराष्ट्र सरकारने तयार केलेली नियमावली आणि या नियमावलीच्या आधारे आपापली परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापकांनी तयार केलेले नियम लक्षात घेऊनच सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी ही शैक्षणिक प्रक्रिया पुन्हा एकदा नव्याने सुरू करायची आहे. भारतात अद्यापही 18 वर्षांखालील मुलांसाठी करोनाची लस उपलब्ध झाली नसल्याने आगामी काळात काळजी घ्यावीच लागणार आहे. 

शाळेत विद्यार्थ्यांचा ज्या व्यक्‍तींशी संपर्क येण्याची शक्‍यता असते त्या व्यक्‍तींनी लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की नाही, हे पाहण्याची गरज आहे. शाळांमधील संपूर्ण शिक्षक वर्ग, इतर शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि मुलांना शाळेत सोडण्याचे काम करणारे रिक्षाचालक किंवा बस चालक यांची करोना चाचणी झाली आहे काय किंवा त्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण घेतले आहेत की काय, याबाबत खात्री करण्याची जबाबदारी स्थानिक शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापकांनी घ्यायला हवी. 

राज्यातील शिक्षण संस्थांचे चालक आणि शिक्षक वर्ग जरी शाळा पुन्हा एकदा सुरू करायला उत्सुक असला तर पालक संघटनांनी मात्र याच एका कारणाने परत शाळा सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे. कारण विद्यार्थी कोणा कोणाच्या संपर्कात येतील याबाबत काहीच खात्री देता येत नसल्याने पालकांच्या मनात धोक्‍याची घंटा वाजू लागली आहे. 

एका बाजूने जर विचार केला तर गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत समाजातील इतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले असल्याने जेवढी गर्दी शाळांच्या आवारात असते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी रस्त्यांवर आणि बाजारपेठेत सध्या आपल्याला दिसत आहे आणि या गर्दीचा लहान मुलेसुद्धा भाग आहेत हे विसरून चालणार नाही. 

रस्त्यावरील गर्दी किंवा बाजारपेठेतील गर्दीचा भाग असलेल्या लहान मुलांच्या बाबतीत जी काळजी घेतली जाते तीच काळजी शाळेच्या आवारात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबंधित शाळांच्या व्यवस्थापनाने, पालकांनी आणि शिक्षकांनी घेतली तर ही प्रक्रिया व्यवस्थित सुरू होऊ शकेल. 

करोना महामारीच्या काळात समोर आलेली सॅनिटायझर, मास्क आणि दोन व्यक्‍तींमध्ये योग्य अंतर ठेवणे या मूलभूत त्रिसूत्रीचे पालन जर गंभीरपणे आणि व्यवस्थितपणे केले तर धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. शाळेच्या आवारात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोणाशीही जवळचा संपर्क येईल असे कोणतेही अभ्यासक्रम किंवा खेळांचे प्रकार यांना सध्या परवानगी नाही. त्यामुळे जोपर्यंत अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे कवच उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी या मूलभूत नियमांचे पालन केले, तरी ते करोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवू शकतात हे वास्तव आहे. 

गेल्या काही दिवसांत समाजातील इतर सर्व व्यवहार व्यवस्थितपणे सुरू असताना फक्‍त शिक्षण क्षेत्राला त्यापासून वंचित ठेवणे योग्य ठरले नसते. संपूर्णपणे नियंत्रित वातावरणातच शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सवय नेहमीच शिक्षण संस्थांचे चालक, शिक्षक यांना असते आणि विद्यार्थीही सर्व नियमांचे पालन करण्यासाठी उत्सुक असतात. रस्त्यावरील गर्दीवर कोणत्या प्रकारचे नियंत्रण ठेवणे शक्‍य नसते; पण शाळेतील विद्यार्थ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे सहज शक्‍य असल्याने, सुरू होणारी शैक्षणिक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल यात खरेतर शंका घेण्याचे कारण नाही. 

पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्र बंद पडू नये असे वाटत असेल, तर सर्वच शिक्षण संस्थांचे संचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी आता सुरू होणाऱ्या शैक्षणिक प्रक्रियेचा गांभीर्याने विचार करून सर्व मूलभूत नियमांचे पालन करूनच जर शाळेत पुन्हा एकदा वाजणाऱ्या घंटेला प्रतिसाद दिला तर महामारीच्या धोक्‍याची घंटा कोणालाही ऐकू येणार नाही. 

जगातील इतर अनेक देशांमध्ये शिक्षण प्रक्रिया पूर्वीच सुरू झाली आहे. भारतातही दिल्ली आणि इतर काही राज्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शाळांचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे. तेथे कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्याच्या बातम्या अजून तरी आलेल्या नाहीत. योग्य काळजी घेतली आणि सर्व मूलभूत नियमांचे व्यवस्थित पालन केले तर करोना महामारी दूर राहू शकते, हा संदेश दिल्ली आणि इतर राज्यांतील शिक्षण व्यवस्थेने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या विषयाचा विनाकारण बाऊ करण्याची गरज नाही. 

दीर्घकाळानंतर शाळांमधली घंटा वाजणार आहे, आवारे गजबजणार आहेत, वर्गात शिक्षकांचे आवाज घुमणार आहेत. प्रश्‍नोत्तरे रंगणार आहेत. यामुळे शंकाकुशंका, भीती बाजूला सारून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात विद्यादानाचे काम करावे, हे निश्‍चित.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.