जेरूसलेम, दि. 22 – इस्रायलमध्ये उद्या संसदीय निवडणुकीचे मतदान होत आहे. इस्रायलमध्ये दोन वर्षात होणारी संसदेची ही चौथी निवडणूक आहे. त्यात पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाच्या संबंधात लोकमताचा कौल स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे त्या अर्थाने ही नेतान्याहू यांच्याविषयीच सार्वमत चाचणी असेल असे मानले गेले आहे. ते गेली 12 वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे भवितव्य निश्चित होईल.
नेतान्याहू यांनीही आपल्या नेतृत्वाखालील सरकारने इस्रायलमध्ये करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करून लोकांना आपल्या बाजूने कौल देण्याचे आवाहन केले आहे. तथापि, त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत त्यामुळे त्यांना मतदार पुन्हा कितपत स्वीकारतील याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
गेल्या 12 वर्षाच्या काळात त्यांनी अनेक राजकीय संकटांना तोंड देत स्वतःचे कसब सिद्ध केले आहे. ते उत्कृष्ट राजकीय व्यवस्थापक मानले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी विरोधकांनी जोरदार आघाडी उघडली असली तरी त्यातून ते सहज निभावून जातील, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. वेळ प्रसंगी ते विरोधकांच्या काही गटांशी हातमिळवणी करून आपले पद कायम ठेवतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.