श्रीनगर, दि. 22 – काश्मिरातील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलास यश आले. त्या जिल्ह्यातील मनिहाल भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी व सुरक्षा दलांनी या भागाला वेढा दिला.
त्यानंतर दोन तासांनी तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. त्यात हे चार दहशतवादी टिपण्यात त्यांना यश आले. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. तेथे नेमके चारच दहशतवादी होते काय आणि त्यांचे बाकीचे सहकारी अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाले किंवा तेथेच लपून बसले आहेत, याचीही माहिती घेतली जात आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांची मदत घेतली जात आहे.