Israel–Hamas War : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने माणुसकीची परिसीमा गाठली आहे, या युद्धात हजारो निष्पाप लोकांचे बळी जाताना दिसून येत आहेत. त्यातच इस्रायलने आता गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं असून येथे सातत्याने हल्ले केले जात आहेत. या रुग्णालयाच्या आतील भागात आणि कुंपणाखाली हमासने कमांड पोस्ट दडवली असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे, मात्र त्याचा काही पुरावा दिलेला नाही. हमास आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे आरोप नाकारले आहेत.
इस्रायलच्या हल्ल्यामुळे रुग्णालयातील मृत्यूची संख्या सातत्याने वाढत असून या रुग्णालयात आता सर्वच सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसूस यांनी केला आहे. इस्रायलला युद्धविरामाचीही विनंती देखील त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
.@WHO has managed to get in touch with health professionals at the Al-Shifa hospital in #Gaza.
The situation is dire and perilous.
It’s been 3 days without electricity, without water and with very poor internet which has severely impacted our ability to provide essential…
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 12, 2023
टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसूस यांनी केलेल्या पोस्टनुसार, “जागतिक आरोग्य संघटनेने अल शिफा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. येथील परिस्थिती भयंकर आणि धोकादायक आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे वीज, पाणी आणि इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे मुलभूत सुविधा पुरवणे कठीण झाले आहे. परिसरात सातत्याने गोळीबार होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे रुग्णालयात मृतांची संख्या वाढली आहे. हे रुग्णालय आता रुग्णालयाप्रमाणे कार्य करत नाहीय.” असे म्हटले आहे.
हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या २४० जणांची सुटका केल्याशिवाय युद्धविराम होणार नाही असे पंतप्रदान बिन्यामिन नेतान्याहू यांनी शनिवारी दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात सांगितले. इस्रायल लढाईत आपली ‘संपूर्ण ताकद’ लावली असल्याचे ते म्हणाले.