Hyderabad Fire : हैदराबादच्या नामपल्ली भागात भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजार घाटातील एका अपार्टमेंटमध्ये ही आग लागली. हे अपार्टमेंट चार मजली असून त्याच्या खालच्या भागाला आग लागली आहे.
अपार्टमेंटमध्ये कार दुरुस्तीचे गॅरेज आहे, ज्याला आग लागली. आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने पसरत होत्या की तिथे उपस्थित असलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत आणि 6 जणांचा या आगीत जागीच होरपळून मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, अनेकांना वाचवण्यात यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आग खूपच भयानक होती आणि आकाशात धुराचे लोट दिसत होते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये बचाव पथक लहान मुले आणि महिलांना अपार्टमेंटच्या खिडकीतून खाली उतरवून वाचवत आहे.