Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्धात कोणताही तोडगा निघत नाही. अजूनही दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्यात येत आहेत. हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या १८व्या दिवशी इस्रायलने सोमवारी केलेल्या हवाई हल्ल्यांत ७०० पेक्षा जास्त लोक ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पॅलेस्टिनींनी याविषयी माहिती दिली आहे. आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान झालेल्या अनेक युद्धांमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली नव्हती. त्याचवेळी, सततचा बॉम्बर्षांव आणि वीजेच्या अभावामुळे अनेक रुग्णालये बंद करावी लागली अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे, हमासने ८५ वर्षीय योशेव्हेड लिफशिट्झ आणि ७९ वर्षीय नुरित कूपर या दोन ओलिसांची सुटका केली. त्यामुळे अन्य ओलिसांच्या सुटकेची आशा वाढली आहे. त्याचवेळी इस्रायलने गाझा पट्टीवरील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली. या हल्ल्यांमध्ये हमासचा नायनाट होईल असा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायलने माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने सोमवारी गाझा पट्टीवर ४०० हवाई हल्ले केले, त्यामध्ये हमासचे कमांडर मारले गेले तसेच दहशतवाद्यांच्या तळाचे नुकसान झाले. तर त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे सोमवारी ३२० हवाई हल्ले करण्यात आले होते. पॅलेस्टाईनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बरेच हवाई हल्ले निवासी इमारतींवर करण्यात आले. त्यामध्ये इस्रायलने ‘नागरिकांसाठी आश्रय घेण्यासाठी सुरक्षित’ घोषित केलेल्या दक्षिण गाझामधील इमारतींचाही समावेश आहे.
दरम्यान, या युद्धामुळे पश्चिम आशियात संघर्षांची ठिणगी पडेल, विशेषत: अमेरिकी सैन्याला त्याचा फटका बसेल अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. त्याचवेळी इस्रायलला युद्धाच्या नियोजनात मदत करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्करी सल्लागारांना पाठवले. युद्धाचा सर्वाधिक फटका गाझा पट्टीमधील २३ लाख पॅलेस्टिनींना बसत असून इस्रायलच्या वेढय़ामुळे त्यांना वाढत्या प्रमाणात अन्न-पाणी आणि औषधांच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. इजिप्तमधून गाझासाठी मदत सामग्री येण्यास सुरुवात झाली असली तरी गरजेच्या तुलनेत ती फारच कमी आहे. तसेच, ट्रकसाठी इंधन मिळाले नाही तर मदत सामग्रीचे वितरण थांबवावे लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. इतकेच नाही तर अन्न शिजवण्यासाठीही पुरेसे इंधन नसल्याचे पॅलेस्टिनींसाठी संयुक्त राष्ट्रांची मदत संस्था ‘यूएनआरडब्लूए’ने लक्षात आणून दिले आहे. कमी करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.