सना (येमेन) – हौथी बंडखोरांनी डागलेली १२ ड्रोन आणि ५ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे कोणत्याही जहाजाचे नुकसान झाले नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
लाल समुद्राच्या दक्षिणेकडे तैनात असलेल्या अमेरिकेच्या नौदलाच्या यूएसएस लेबोन आणि आयसेनहॉवर कॅरिअर स्ट्राइक ग्रुपच्या एफआयए-१८ ने ही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली आहेत.
लाल समुद्रातील बाब-एल- मान्देन या सागरी मार्गावरील व्यापारी जहाजांवर हौथी बंडखोरांकडून होत असलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकेची ही दोन जहाजे या भागात तैनात आहेत. इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांनी गाझाच्या समर्थनार्थ एका जहाजावर ही ड्रोन डागली होती.
दरम्यान इस्रायलच्या दिशेने येत असलेले एक विमान समुद्रात पाडल्याचा दावाही इस्रायलने केला आहे. हौथींकडून होत असलेले हे हल्ले म्हणजे इराणच्या आदेशांवरून केले गेलेले दहशतवादी हल्ले असल्याचे इस्रायलच्या सैन्याचे प्रवक्ते रिअर ऍडमिरल डॅनिएल हगारी यांनी म्हटले आहे. इस्रालच्या दिशेने येत असलेले विमान आकाबाच्या आखातामध्ये पाडले जात असल्याचा एक व्हिडीओ इस्रायली फौजांनी प्रसिद्ध केला आहे.