तेल अविव – गाझा पट्ट्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शाळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या शाळेमध्ये पॅलेस्टिनी शरणार्थ्यांनी आश्रय घेतलेला होता. या शाळेतील वर्गांमध्ये अनेक शरणार्थ्यांची हत्या केल्याचे आढळून आले आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि काही महिलांचाही समावेश आहे. धुळीने माखलेल्या वर्ग खोल्यांमध्ये मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले आहेत.
भिंतींवर बंदुकींच्या गोळ्यांमुळे अनेक छिद्रे झाली आहेत. तर खोल्यांचे छत फुटून आवारात त्याचे तुकडे पडले आहेत, असे एका वृत्तवाहिनीच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. “युनायटेड नेशन्स रिलीफ ऍन्ड वर्क्स एजन्सी’च्या प्रमुख ज्युलिएट टॉर्ना यांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांची एकूण संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून ही शाळा पॅलेस्टिनी शरणार्त्यांसाठी चालवली जाते. तसेच या शाळेमध्ये शरणार्त्यांसाठी आश्रय छावणी देखील चालवली जाते आहे. या शाळेवर हा हल्ला कधी झाला आणि हल्ला कोणी केला हे संयुक्त राष्ट्राच्या मदत एजन्सीला सांगता येऊ शकलेले नाही.
हा हल्ला झाला तेंव्हा या शाळेमद्ये हजारो शरणार्थ्यांनी आश्रय घेतला होता. इस्रायलच्या सैन्य दलांकडून या घटनेचे अवलोकन केले जाते आहे. मात्र या व्यतिरिक्त अन्य कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही.
कतार आणि इजिप्तचा इस्रायलवर रोष…
संयुक्त राष्ट्राच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याबद्दल कतार आणि इजिप्तने इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलकडून गाझा पट्ट्यामध्ये जसे मानवतावादी मूल्ल्यांचे उल्लंघन केले जाते आहे, तसेच या शाळेवरील हल्ल्यातही केल्याचे इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींनी गाझामध्ये जाऊन तेथील शाळांना कसे लक्ष्य केले जात आहे, याची पहाणी करावी आणि या शाळेवरील हल्ल्याचा त्रयस्थांकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी कतारने केली आहे.