प्रांताधिकारी संगीता राजापूरकर; वाईतील विलगीकरण कक्षातील परिस्थितीचा घेतला आढावा
वाई (प्रतिनिधी) – किसन वीर महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षासंदर्भात अनेक तक्रारी सोशल मीडियावरुन फिरत आहे. त्या अनुषंगाने प्रातांधिकारी संगीता राजापूरकर यांनी या कक्षाची पाहणी केली. तसेच विलगीकरण कक्ष म्हणजे पंचतारांकित हॉटेल नव्हे, तर प्रशासनाने तयार केलेली एक व्यवस्था आहे, त्यामुळे कोणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या, असे सडेतोड उत्तर सोशल मीडियावरुन व्हायरल होत असलेल्या टीकेला त्यांनी दिले. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, वाई गटविकास अधिकारी उदय कसूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी भेट देवून या कक्षातील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी संबंधित अधिकारीऱ्यांनी प्रत्यक्ष स्वतः पीपीइ किट परिधान करुन विलगिकरण कक्षाचे आत जाऊन पहाणी केली. तसेच विलगीकरण कक्षातील नागरिकांशी संवाद साधून तेथील स्वच्छता तसेच देण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांची माहिती घेत जेवण, पाणी, निवास व्यवस्था या बद्दलची माहिती जाणून घेतली.
गेल्या दोन दिवसांपासून शिरवळच्या विलगीकरण कक्षाचे ज्या पद्धतीने स्टींग ऑपरेशन केले होते, त्या पद्धतीने वाई विलगीकरण कक्षाचे स्टींग ऑपरेशन करणे गरजेचे आहे का? त्यावर सोशल मीडियावरुन वाई विलगीकरण कक्षात परिस्थिती वेगळी नाही, अशा कमेंट्स पास झाल्या होत्या. त्या अनुषंगाने वाईच्या प्रांताधिकारी यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. त्याचप्रमाणे तेथे उपस्थित असलेल्या एका खोलीतील नागरिकास एकावेळी एका खोलीत 4 पेक्षा जास्त व्यक्ती का रहात आहेत, याची विचारणा केली असता, संबंधित लोकांनी संगितले की, आम्ही सर्वजण एकच कुटुंबातील आहोत व आमच्यासोबत लहान मुले व वृद्ध व्यक्ती असल्याने आम्ही वेगळ्या वेगळ्या खोलीत राहण्यापेक्षा एकत्र रहात असल्याचे सांगितले.
यावेळी त्यानी विलगिकरण कक्षाचे येथे कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबतसुद्धा संवाद करुन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. कार्यरत कर्मचारी यांनी सदर विलगीकरण कक्षात योग्य स्वच्छता ठेवली जात असून तेथील नगरिकांना योग्य मुलभूत सुविधा दिल्या जात असल्याचे संगितले.त्याचप्रमाणे काही नागरिक मात्र विलगीकरण कक्षात शिस्त पालन करीत नसल्याचीसुद्धा तक्रार केली. तसेच काही नागरिक तेथे कार्यरत कर्मचारी यांना उद्धट बोलणे, महिला कर्मचारी यांच्या अंगावर धावून जाणे असे बेशिस्त वर्तन करीत असल्याचेही संगितले. यावर उपविभागीय अधिकारी वाई व तहसीलदार वाई यांनी या घटनांबाबत सविस्तर अहवाल देण्याच्या या कर्मचारी याना सुचना दिल्या. यावेळी विलगिकरण कक्षाचे नियंत्रण अधिकारी डॉ. श्रीमती योजना तराळ तसेच पोलीस उपनिरीक्षक मोतेकर तसेच स्वच्छतचे कंत्राटदार सुनील सबणे उपस्थित होते.