फलटण (प्रतिनिधी) – फलटण शहर व तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काल (दि. 18) रात्री उशिरा आलेल्या अहवालांनुसार साखरवाडी येथे आठ, चव्हाणवाडी येथे चार, सावंत वाडा (उपळवे) येथे दोन तर फलटण शहरात एक, अशा एकूण 15 जणांना करोनाची बाधा झाली आहे. फलटण तालुक्यात बाधितांची एकूण संख्या 150 झाली आहे.
साखरवाडी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील 43 व 50 वर्षांचे पुरुष, 15 व 16 वर्षांची मुले, 38, 43 व 65 वर्षांच्या महिला आणि 18 वर्षांची मुलगी, अशा एकूण आठ रुग्णांच्या कोव्हिड चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सावंत वाडा (उपळवे) येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या चव्हाणवाडीतील 25 व 53 वर्षांचे पुरुष, 22 व 43 वर्षांच्या महिला, अशा एकूण चार रुग्णांच्या कोव्हिड चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सावंत वाडा (उपळवे) येथील पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाची 46 वर्षांची पत्नी व निकट संपर्कातील 26 वर्षांचा युवक यांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. फलटण शहरातील महात गल्लीमधील 45 वर्षांच्या पुरुषाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात 1972 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.