मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात सरकार आल्यानंतर एसटी महामंडळाचे विलीनीकरण करू, अस आश्वासन दिलं होतं. आंदोलकांकडून आज वारंवार हेच बोलले जात आहे. आता राष्ट्रवादीवाले म्हणतात, हे सर्व भाजपने केलं किंवा देवेंद्र फडणीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय घडलं?
अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत होत्या.