गोंडा (उत्तर प्रदेश) – अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि खुनाच्या आरोपाखाली आसाराम बापू कारागृहात आहेत. मात्र आसारामचे आश्रम आजही देशाच्या अनेक भागात सुरू आहेत. यापैकी उत्तर प्रदेशातील गोंडा येथील एका आश्रमातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशातील बहराईच रोडवरील आसाराम बापूच्या आश्रमात गुरुवारी मध्यरात्री एका कारमधून एका 13 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे.
ही मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसींनी आश्रमाला सील ठोकले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 100 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडाच्या कोतवाली भागातील बिमौर गावात आसाराम बापूचा आश्रम आहे. याच आश्रमाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये 13 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. चौकशीत आश्रमापासून या मुलीचे घर काही अंतरावर असून चार दिवसांपासून ती बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्या कारमध्ये हा मृतदेह सापडला ती कार देखील अनेक दिवसांपासून आश्रमात उभी होती.
मात्र गुरुवारी रात्री उशिरा या आश्रमात उभ्या असलेल्या या कारमधून उग्र वास येऊ लागला. यावेळी आश्रमातील कर्मचाऱ्यांनी कार उघडून पाहिली असता आतमध्ये मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकचं खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीम आश्रम आणि वाहनाची चौकशी करत आहेत. तसेच आश्रम देखील सील करण्यात आलेय. प्रथमदर्शनी हा खून केल्यानंतर मृतदेह लपवून ठेवल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नामांकित लोकांविरोधात तक्रार
मुलीच्या आईने सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझे पतीही अचानक बेपत्ता झाले. ज्या लोकांनी माझ्या पतीला बेपत्ता केले त्याच लोकांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मुलीच्या आईने काही नामांकित लोकांविरोधात तक्रार दिली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे