“इसिस’ संपूर्ण युरोपात हल्ले करण्याच्या तयारीत ; ब्रिटीश प्रसार माध्यमाचा दावा

लंडन – इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेकडून संपूर्ण युरोपभर घातक हल्ले केले जाण्याचा कट केला जात असल्याची शक्‍यता ब्रिटीश प्रसारमाध्यमाने वर्तवली आहे. पॅरिसमध्ये कॉन्सर्टहॉलवर झालेल्या हल्ल्याप्रमाणेच हे हल्ले घातक असणार आहेत. युरोप आण्इ मध्यपूर्वेत दहशतवादी हल्ल्यांबाबत इसिसच्या कटाचा सविस्तर तपशीलच ब्रिटनमधील वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला आहे. नोव्हेंबर 2015 मधील पॅरिससारखा हल्ला पुन्हा घडवण्यासाठी इसिसच्या सक्रिय हस्तकांकडूनचे जोरात प्रयत्न सुरू आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.

नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसच्या उत्तरेकडील उपनगर असलेल्या सेंट डेनिसमध्ये एकापाठोपाठ एक दहशतवादी हल्ल्यांची मालिकाच झाली होती. स्लेड दी फ्रान्स या स्टेडियममध्ये एका फुटबॉलसामन्याच्यावेळी तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी प्रवेशद्वाराजवळ बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यानंतर स्वैर गोळीबार आणि जवळच्या रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोटही केला गेला होता. या हल्ल्यात 130 जण ठार झाले होते.

इसिसच्या या मोठ्या कटाशी संबंधित काही महत्वाची कागदपत्रे सिरीयातील अखेरच्या लढाईनंतर दहशतवाद्यांकडील एका हार्डड्राईव्हमध्ये सापडली आहेत. सिरीयातील खिलाफत जरी नष्ट केली गेली असली तरी इसिसकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेटवर्क अजूनही सांभाळले जात आहे. दहशतवाद्यांच्या सीमापारच्या हालचाली, निधी संकलन आणि बॅंकांवरील दरोडे, आत्मघातकी हल्ले, हत्या आणि कॉम्प्युटर हॅकिंग कसे केले जाईल, याची सविस्तर माहिती या हार्डड्राईव्हमध्ये आहे.

इसिसचा म्होरक्‍या, खलिफा अबु बक्र अल बगदादी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इसिसचे विदेशातील काम कारवाया आणि सीमा अशा दोन भागात विभागले गेले आहे. कारवायांचे नेतृत्व इसिसचा म्होरक्‍या अबू खबाब अल मुहाजीरकडे आहे. त्याच्याकडे रशियातील एक आणि जर्मनीतील दोन सेलची जबाबदारी आहे. तर अन्य एक गट ईशान्य सिरीयामध्ये स्वतंत्र विभागातून कार्यरत असेल. या सेलची जबाबदारी खलिफासाठी पैसे चोरणे ही असेल. तर अविश्‍वासू भांडवलदारांची हत्या, बॅंकांची खाती हॅक करणे, बॅंकांवरील दरोडे घालण्यासाठीची तयारी हा दुसरा भाग आहे. या कारवायांसाठीचे कट तयार झाल्यावर त्यासाठी पैसे पाठवण्यात येतील, असे यामध्ये म्हटले आहे.
या कागदपत्रांमध्ये 2015 मधील पॅरिस आणि 2017 मधील मॅनहटनमधील हल्ल्यांचाही उल्लेख आहे. या हल्ल्यांमध्ये गर्दीत ट्रक घुसवून अनेक जणांना ठार करण्यात आले होते.
सिरीया आणि इराकमधील दहशतवादी गट अजूनही सक्रिय असल्याचे युरोप आणि अन्य भागातील एका इसिस समर्थकाकडून मिळालेली काही चित्रांमधून निष्पन्न होते, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.