पुणे -“इसिस’ दहशतवादी संघटनेच्या महाराष्ट्र गटाशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. पुण्यात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांना पकडले होते. त्यानंतर हा साथीदार पसार झाला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांकडे केलेल्या तपासात त्यांनी सरतेशेवटी सिलिंग फॅनमध्ये लपवलेली बॉम्बची रेसिपी सापडली होती. ही रेसिपीच दहशतवाद्यांना शिक्षेपर्यंत पोहचवण्यास महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.
मोहंमद शाहनवाज (30) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड परिसरात 18 जुलै 2023 रोजी दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या युनूस मोहम्मद याकू साकी (24), इम्रान मोहंमद युसूफ खान (23) यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद पसार झाला होता. तिघे दहशतवादी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घोषित केलेले फरार दहशतवादी आहेत. त्यांना मदत केल्याप्रकरणी झुल्फिकार अली बडोदावाला याला मुंबई कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते.
“आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेचा महाराष्ट्रात प्रसार केल्याप्रकरणी कोंढवा भागातून डॉ. अदनान अली सरकार याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) एनआयएकडे सोपविण्यात आला. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी एटीएसने कादीर दस्तगीर पठाण (32, रा. कोंढवा) आणि सिमाब नसरुद्दीन काझी (27 , मूळ रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली होती.
…असा झाला होता पसार
पुण्यात घातपाती कारवाईच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. दरम्यान, कोथरूड पोलीस घरझडती घेण्यासाठी कोंढवा परिसरात गेले असता, मोहम्मद हा गाडीतून उतरत असताना पोलिसांना हिसका देऊन पसार झाला होता. तेव्हा तो वाहनचोर असल्याचे वाटल्याने प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले नव्हते. मात्र, सकाळपर्यंत तो “एनआयए’ने बक्षीस ठेवलेला फरार दहशतवादी असल्याचे लक्षात आले.
यानंतर एटीएसने तातडीने त्याच्या मागावर पथके रवाना केली होती. त्याचे मोबाइलचे लोकेशन वसईपर्यंत आढळले होते. यानंतर त्याने मोबाइल फेकून दिला. यानंतरही एटीएसचे पथक त्याचा माग काढत सुरत-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली-मथुरापर्यंत धडकले होते. यानंतर मात्र त्याचा माग न लागल्याने पथक पुन्हा परतले होते.