नीलकंठ मोहिते,रेडा(प्रतिनिधी): पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असणारे निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाच्या कामाला आणि वसाहतीला तसेच कार्यालयाला अनेक समस्यांनी ग्रासले असून, ब्रिटिश कालीन उभे असणारे विश्रामधाम व कार्यालय जीर्ण झाल्यामुळे अखेरच्या घटका मोजतो आहे. त्यामुळे तब्बल 12 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यासाठी चालणारी यंत्रणा रडारवर कशासाठी असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ब्रिटिश कालीन निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाची कार्यालय इमारत तसेच विश्रामधाम व शाखा अभियंता यांची निवासस्थाने, वायरलेस केंद्र याची कौलारू पद्धतीची जीर्ण झालेली बांधकामे आहेत. इंदापूर बारामती या रस्त्यावरती निमगाव केतकी हे दुष्काळी 22 गावातील बाजाराचे व दळणवळणाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. 16 नोव्हेंबर 2017 रोजी या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीला प्राधान्य देऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनी याविभागाची नवीन निर्मिती निमगाव केतकी येथे केली. परंतु त्या काळच्या भाजप सरकारने उपविभागाची मान्यता देताना या कार्यालयासाठी लागणारे कर्मचाऱ्यांचे संख्याबळ पाहिजे तितके दिलेले नाही.
या विभागाचा कारभार चालण्यासाठी तब्बल 42 अधिकारी-कर्मचारी यांची नितांत गरज असताना,केवळ 18 कर्मचारी या उपविभागात काम करीत आहेत. तर चार शाखा अभियंता आवश्यक असताना,केवळ दोन शाखा अभियंते सध्या कार्यरत असल्यामुळे अतिरिक्त कामाचा तणाव वाढता असल्यामुळे या पाटबंधारे उपविभागाची अवस्था मोरीला बोळा आणि दरवाजा रिकामा अशी झालेली दिसते.
येथील विश्रामग्रह हे ब्रिटिश काळातील असल्यामुळे यामध्ये कक्ष क्रमांक एक व कक्ष क्रमांक दोन असे दोन सुट आहेत. या विश्रामगृहावर असणारी जुनाट पद्धतीची कवले जीर्ण झाली असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असते. तसेच खुर्च्या दिवान व गाद्या जीर्ण झालेल्या आहेत. तर स्वच्छतागृह बंद पडलेले आहेत.
पाटबंधारे विभागामध्ये वायरलेस दूरसंवेदन यंत्रणा महत्त्वाची असते. परंतु या विभागांमध्ये वायरलेस यंत्रणा निकामी झाल्यामुळे ती बंद आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येथील विभागाला वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीची सामना करावा लागतो. म्हणून येथील वायरलेस दूरसंवेदन यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी या विभागातील अधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी केलेले आहे.
येथील वसाहतीला लाखो रुपये खर्चून अद्ययावत संरक्षण भिंत बांधण्यात आली. परंतु आत येण्याचा गेट व बाहेर जाण्याचे गेट बसवले नसल्यामुळे खाजगी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे.
निमगाव केतकी पाटबंधारे उपविभाग सुस्थितीत करणार – आमदार दत्तात्रय भरणे या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निमगाव केतकी तालुका इंदापूर येथील पाटबंधारे कार्यालयाला उपविभागाची निर्मिती पाठपुरावा करून सन 2017 ला केली. शासनाकडे या उपविभागात करता लागणारे कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे संख्याबळ यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.येथील विश्रामधाम तसेच अद्ययावत कार्यालय सुस्थितीत करण्यासाठी,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सरकारमध्ये असल्यामुळे शासनाकडून निधी मिळवला जाईल.