चौकशी करण्याची हडपसरचे आमदार
चेतन तुपे यांची विधानसभेत मागणी
पुणे – शहरातील वेगवेगळ्या 10 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत केली.
शहरात वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत आणि काही प्रकल्प सुरू होणार आहेत चोवीस तास पाणी पुरवठा, एचसीएमटीआर, मेट्रो, नदी सुधार योजना, यांच्यासह अन्य प्रकल्प आहेत. यातील काही प्रकल्पांमध्ये अनियमितता झाली आहे. तर काही प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू आहेत. ठराविक एकाच कंपनीला कामे मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी तर महापालिकेच्या निविदांची माहिती असलेली संगणकातील सर्व माहिती गायब झाली होती. त्यामुळे या कामांची सखोल माहिती घेण्याची गरज असल्याचे तुपे यांनी सभागृहात सांगितले.
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेमध्ये अनियमितता झाली आहे. सुरूवातीला या प्रकल्पाच्या निविदा मोठ्या रकमेच्या होत्या. त्यानंतर त्या सुमारे बाराशे कोटी रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे त्या वाढल्या का होत्या याची चौकशी झाली पाहिजे. पुण्यात नुकतेच मुंढवा येथे एका पुलाच्या कामाला मंजुरी दिली. हे करत असताना विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर पूल न बांधता अन्य ठिकाणी करण्यात आला, यामध्येही अनियमितता आहे.
तर, कात्रज चौकातील कामाला मंजुरी मिळाली असताना अद्याप काम सुरू झाले नाही. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आली मात्र येतील नागरिकांना योग्य मोबदला मिळत नाही. सरकारने चांदणी चौक येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी भूसंपादन लवकर व्हावे, यासाठी निधी दिला. त्याच धर्तीवर कात्रज ते कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला निधी द्यावा. कोंढवा येथील हज हाऊसच्या कामाला मान्यता मिळाली असली, तरी गृहविभागाची परवानगी मिळाली नाही. गेल्या तीन वर्षांपासून ही फाइल पुण्यातच आहे, त्यालाही परवानगी मिळावी, अशीही मागणी तुपे यांनी केली आहे.