विश्‍वविजेत्या इंग्लंडचा 85 धावांत खुर्दा

लंडन – क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लॉर्डस मैदानावर विश्‍वविजेतेपदाचे स्वप्न साकार करणाऱ्या इंग्लंडचा आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावांत 23.4 षटकांत 85 धावांत खुर्दा उडाला. आयर्लंडच्या टिम मुर्ताघने पाच गडी बाद करीत त्यांच्या फलंदाजांची दाणादाण उडविली.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मात्र, त्याचा हा निर्णय अंगलटीच आला. आयर्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करीत त्यांच्या फलंदाजांची त्रेधातिरपीठ उडविली. त्यांना क्षेत्ररक्षकांचीही चांगली साथ मिळाली. विश्‍वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा जेसन रॉय याने ऑली स्टोन याच्यासमवेत कसोटी पदार्पण केले. रॉय हा केवळ पाच धावा काढून बाद झाला. इंग्लंडकडून जो डेन्ली (23), सॅम क्‍युरन (18) व स्टोन (19) हे तीनच फलंदाज दोन आकडी धावा करू शकले.

आयर्लंडच्या मुर्ताघने 9 षटकांत केवळ 13 धावांमध्ये 5 गडी बाद केले. कसोटीत एकाच डावात पाच गडी बाद करण्याची त्याचा हा पहिलाच पराक्रम आहे. कसोटी पदार्पण करणाऱ्या मार्क ऍडेरने 32 धावांमध्ये 3 बळी घेतले तर बॉईड रान्किन याने केवळ 5 धावांत 2 विकेट्‌स घेतल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)