Prime Minister Modi | Security | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातून रोड शो केला. आता मंगळवारी कोलकाता येथे त्यांचा रोड शो प्रस्तावित आहे. आपल्या निवडणूक रथात उभे राहुन मोदी रोड शो करतात. ती एक कारच असते, मात्र सामान्य नसते.
सर्व प्रकारचे हल्ले थोपवू शकणारी यंत्रणा त्यात असतेच, मात्र निवडणूक व्यवस्थापन, जनसंपर्क, गर्दीचे नियोजन करणे आदी सर्व बाबी त्यांच्या या काररूपी रथातूनच हाताळल्या जातात. त्यासाठी ईसुजू कंपनीच्या डी- मॅक्स मॉडेलचा वापर करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये पंतप्रधानांनी अहमदाबाद येथील ४५ किमीच्या रोड शोसाठी या रथाचा वापर केला होता. त्याचा मोदी आणि भारतीय जनता पार्टीला असा लाभ झाला की लोकांना सभेच्या ठिकाणी बोलावण्याची आवश्यकता भासली नाही.
तर मोदी थेट हजारो- लाखो लोकांपर्यंत थेट पोहोचू शकले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेल्या लोकांना पंतप्रधानांना प्रत्यक्ष आणि अगदी जवळून पाहता आले. मोदींनीही हात हलवून त्यांना अभिवादन केले.
जेंव्हा एखादा मोठा नेता आणि तेही पंतप्रधान आपल्या एवढ्या जवळून जातात तो सर्वसामान्य लोकांसाठी एक आकर्षणाचा क्षण असतो व त्याचे त्यांना अप्रूप असते. नेता आणि नागरिक यांच्यातील अंतर किंवा दरी कमी करण्याचा हा एक नामी उपाय असतो. या प्रयोगाची उपयुक्तता भाजपच्या ध्यानात आल्यानंतर अशा २० कार आणखी सज्ज केल्या गेल्या.
जाणून घ्या, कारची वैशिष्टे :-
* अहमदाबाद येथील मोदी यांच्या रोड शोशी संबंधित एका नेत्याने सांगितले की कार पाच आसनांची होती म्हणजे फाइव्ह सीटर होती. त्याच्या खालच्या भागात २५ एमएमची धातुची एक पट्टी लावलेली होती. कोणत्याही बॉम्बस्फोटापासून ही पट्टी कारचे संरक्षण करते.
* कारच्या मागच्या बाजूला जेथे मोदी उभे राहतात तेथे दोन्ही बाजूंना ५-५ एमएमच्या प्लेट लावल्या असतात आणि त्या बुलेटप्रूफ असतात.
* कारच्या आत एनएसजी कमांडो आणि एक अतिरिक्त चालक असतो. मोदी यांच्या आजूबाजूला एक एक आणि मागे चार नेते उभे राहु शकतात.
* पंतप्रधानांना उभे राहण्याससाठी सहा इंचाचा एक स्टुल लावलेला असतो. त्यामुळे त्यावर उभे राहुन पंतप्रधानांना अधिक चांगल्या प्रकारे जमावाकडे पाहता येईल आणि जमावही त्यांना पाहु शकेल.
* पंतप्रधानांच्या चेहऱ्यासमोर एक पॅनेल आणि एलईडी असते. त्याचा फायदा असा होतो की प्रचंड उष्णता असली अथवा रात्र जरी असली तरी ते रोड शो करू शकतात.
* प्रत्येक रोड शो नंतर ही कार सर्व्हिस सेंटरला पाठवून तिची सर्व्हिसिंग केली जाते. तिचा उपयोग किंवा आता वापर करण्याची गरज नसेल तर ती कार भाजपच्या मुख्यालयात ठेवली जाते. कारच्या देखभालीची जबाबदारी तेथील प्रदेश महामंत्र्यांवर असते.
* केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, बंगाल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांत या काररूपी रथातून रोड शो करण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनीही अहमदाबाद येथे याच कारमधून रोड शो केला होता.