Indian Premier League 2024 – यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक बीसीसीआयकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. तर आता दुसरा टप्पाही भारतच होणार असल्याचे मत आयपीएल समितीचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी व्यक्त केले आहे.
पहिला टप्पा येत्या 22 मार्च ते 7 एप्रिल या दरम्यान होणार आहे. तसेच दुसरा टप्पाही भारतातच होणार असून या टप्प्यातील लढती होम व अवे अशा स्वरूपातच होतील, असेही धुमल यांनी सांगितले.
भारतामध्ये 2019 मध्ये लोकसभा निवडणूक होती. त्यावेळीही आयपीएलचा संपूर्ण मोसम भारतातच पार पडला होता. यंदाही तसेच होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर आयपीएलच्या पुढील टप्प्याबाबत निर्णय घेण्यात येईल. वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक संघाला स्वत:च्या घरच्या मैदानांवर सामने खेळायला मिळायला हवेत यासाठीही पुढाकार घेण्यात येणार आहे. वेळेअभावी हे होऊ न शकल्यास यामधून योग्य तो पर्याय निवडून मार्ग शोधला जाणार आहे, असेही त्यांनी नमुद केले.
आयपीएलचा पुढील टप्पा भारताबाहेर होण्याची शक्यता अरुण धुमल यांनी फेटाळली. एप्रिल व मे या दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे प्रचंड उन्हाळा असतो. त्यामुळे तेथे सामने होऊ शकत नाहीत. तसेच इतर देशांच्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू आहेत. शिवाय कमी कालावधीत आयपीएलसारखी मोठी स्पर्धा आयोजित करणे सोपे काम नाही, असे स्पष्टीकरणही धुमल यांनी दिले.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
मे महिन्याच्या अखेरीस अंतिम सामना
बीसीसीआय व आयपीएल संयोजन समितीसमोर यंदा लोकसभा निवडणूक तसेच टी-20 विश्वकरंडकाचाही प्रश्नआहे. एक जूनपासून वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-20 विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी आयपीएल स्पर्धा संपवणे गरजेचे आहे. आयपीएलचा अंतिम सामना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात खेळवण्याचा प्रयत्न आहे. 25 किंवा 26 मे या दिवशी अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी साखळी फेरीत एका दिवशी दोन लढती खेळवण्याची योजनाही आहे, असेही धुमल यांनी स्पष्ट केले आहे.