बंगळुरू – कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर तिलक वर्माने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 171 अशी समाधानकारक मजल मारली. एकवेळ धावांची शंभरी तरी पार करणार का, असे चित्र असताना वर्माने केलेली खेळी बंगळुरूसमोर आव्हान निर्माण करणारी ठरली.
बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मुंबईच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ईशान किशनने सुरुवात धडाक्यात करत 2 चौकार फटकावले. मात्र, विनाकारण फटका खेळून तो 10 धावांवर महंमद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर बाद होण्याची जणू स्पर्धाच लागली होती.
कर्णधार रोहित शर्मा याने साफ निराशा केली. अवघी एक धाव काढून तो तंबूत परतला. कॅमेरून ग्रीनकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तोदेखील 5 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 15 धावांवर परतला. यावेळी तिलक वर्मा खेळपट्टीवर आला व त्याने संघाचा डाव सावरला. त्याने नेहाल वधेराला साथीला घेत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
A good chase up ahead.
Time for our batters to come to the party! 👊#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvMI pic.twitter.com/qi1yPcja2u
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 2, 2023
वधेरा स्थिरावला असे वाटत असतानाच 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 21 धावांवर बाद झाला. टीम डेव्हीड व हृतिक शोकीनही अपयशी ठरले. समोरून एकेक फलंदाज बाद होत असताना तिलक वर्माने अर्धशतक पूर्ण केले. तसेच संघाचा डाव एकहाती सावरताना संघाला दीडशतकी धावसंख्येच्या पुढे मजल मारून दिली. त्याने नाबाद 84 धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्यात त्याने 46 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.
#IPL2023 #RCBvMI : बेंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11
तळात अर्शद खानने नाबाद 15 धावांची खेळी करत तिलकला साथ दिली. बंगळुरूकडून कर्ण शर्माने सर्वाधिक 2 गडी बाद केले. रीस टोपले, मायकल ब्रेसवेल, महंमद सिराज, आकाशदीप व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत सुमार कामगिरी कायम राखली. त्याच्यासह प्रमुख फलंदाज साफ अपयशी ठरले.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 7 बाद 171 धावा. (ईशान किशन 10, सूर्यकुमार यादव 15, नेहाल वधेरा 21, तिलक वर्मा नाबाद 84, अर्शद खान नाबाद 15, कर्ण शर्मा 2-32).