मुंबई -आयपीएलमध्ये रविवारी डबल हेडर सामन्यांमध्ये प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रोमांचक सामना रंगणार आहे. विराटच्या नेतृत्त्वात बंगळुरूने सलग चार, तर धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने सलग तीन सामने जिंकले आहेत. यामुळे ही विजयी मालिका कायम राखण्यासाठी दोन्ही संघात लढत रंगणार आहे.
यंदाच्या सत्रातील वानखेडे स्टेडियमवरील रविवारी होणार हा अखेरचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. बंगळुरू सर्व चार सामने जिंकत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे चेन्नईने सलामीची लढत गमविल्यानंतर सलग तीन सामने जिंकत दुसऱ्या क्रमांकावर दावा केला आहे.
गत सामन्यात राजस्थानविरुद्ध दहा विकेट्सने एकतर्फी सामना जिंकलेला बंगळुरू विजय मालिका सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. या सामन्यात कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. यामुळे चेन्नईच्या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे. सध्या पडीक्कल चांगल्या फॉर्मात आहे. तसेच एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून अव्वल कामगिरीची आशा आहे. तथापि, गोलंदाज महंमद सिराजने प्रभावी गोलंदाजी केली आहे.
दुसरीकडे चेन्नईची फलंदाजीही खूप मजबूत असल्याचे दिसत आहे. मोईन अली, सुरेश रैना हे सहभागी झाल्याने संघात फलंदाजी संतुलित झाली आहे. महेंद्रसिंह धोनीला अद्याप सुर गवसलेला नसला तरी फाफ डुप्लेसीसमध्ये ऐनवेळी सामना पलटविण्याची क्षमता आहे. तसेच गोलंदाजीत दीपक चहरने आतापर्यत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याशिवाय सॅम करन, रवींद्र जडेजा आणि लुंगी एनगीडीनेही चांगले प्रदर्शन केले आहे. यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
सामन्याची वेळ
दुपारी : 3ः30
ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर