मुंबई -मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज आपल्या वाढदिवशी एक व्हिडिओ शेअर करत करोना परिस्थितीवरून प्लाझ्मा दान करणार असल्याची माहिती दिली. तसेच सर्वांना काळजी घेण्याचे आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.
या व्हिडिओत सचिन म्हणाला की, मागचा महिना माझ्यासाठी आव्हानात्मक होता. मी करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळलो होतो. माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ यांनी सर्वांनी मी बरा होण्यासाठी मदत केली. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.
मला एक डॉक्टरांनी सांगितलेला मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. मी मागच्या वर्षी प्लाझ्मा डोनेशन सेंटरचे उद्घाटन केले आहे. प्लाझ्मा जर योग्यवेळी मिळाला तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. मी योग्य वेळी प्लाझ्मा दान करणार आहे. याबाबत डॉक्टरांशीही चर्चा केली आहे. तुमच्यापैकी जे कुणी कोविड-19 मधून बरे झाले आहेत, त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करावी आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा कृपया प्लाझ्मा दान करावे. त्यामुळे बराच त्रास कमी होईल. हा त्रास काय असतो ते तुम्हाला माहिती आहे. त्याचा तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही त्रास होतो. तो त्रास कमी व्हावा यासाठी प्लीज प्लाझ्मा दान करा, असे आवाहन सचिनने केले आहे.