मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रासाठी दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सचे आगामी आयपीएल स्पर्धेसाठीचे सराव सत्र लवकरच सुरू होत आहे. ही स्पर्धा अर्जुनसाठी पहिलीवहिली आयपीएल स्पर्धा असून, त्यासाठी अर्जुन सज्ज बनला आहे.
अर्जुनचे नाव जेव्हा आयपीएलच्या लिलावाच्या यादीत आले होते तेव्हा त्याला कोणता संघ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुनला त्याच्या 20 लाख या बेस प्राइजवर आपल्याकडे घेतले.
आता मुंबई इंडियन्स त्याला यंदाच्या स्पर्धेतील काही सामने खेळायची संधी देणार का याची उत्सुकता लागली आहे.
यावर्षीच्या आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या आयपीएलमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी विक्रमी पाचवे जेतेपद पटकावले होते, पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाला अजूनपर्यंत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.