#IPL2019 : मुंबईवर राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

मुंबई – यष्टीरक्षक जोस बटलर (87)याने खेळलेल्या शानदार खेळीच्या मदतीने राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 4 विकेटस्‌नी पराभूत केले. अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने 4 धावांत 4 गडी बाद करत सामन्यात रंगत आणली. परंतु श्रेयस गोपाळने चौकार खेचत विजयावर शिक्‍कामोर्तब केला. या विजयासह राजस्थानने या सत्रातील दुसरा विजय नोंदविला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्या. 188 धावांचा पाठलाग करताना राजस्थानकडून सलामीवीर अंजिक्‍य रहाणे आणि जोस बटलर यांनी 60 धावांची भागिदारी करून निर्णायक सुरूवात करून दिली. राजस्थानला सातव्या षटकात पहिला झटका बसला. कृणाल पांड्याने सूर्यकुमार करवी अजिंक्‍य रहाणेला (37) बाद केले.

त्यानंतर बटलर आणि संजॅ सॅमसन यांनी दुस-या विकेटसाठी 87 धावांची भागिदारी करत विजयाची पायाभरणी केली. परंतु अखेरच्या षटकांमध्ये राजस्थानच्या 4 धावांत 4 गडी बाद झाल्याने सामन्यात रंगत आली. संजू सॅमसन (31) हा 170 धावसंख्यावर बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी (1), लिविंगस्टोन (1) आणि स्टीव्ह स्मिथ (12) हे झटपट बाद झाले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या मुंबई इंडियन्सने आक्रमक सुरूवात केली.

रोहित शर्मा आणि डी कॉक यांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता दहाच्या सरासरीने 57 धावा केल्या. पॉवर प्लेमधील मुंबई इंडियन्सची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करताच आणखी एक विक्रमाची नोंद केली. यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सकडून झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.

कृष्णप्पा गौतमने टाकलेल्या दहाव्या षटकातही चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली, परंतु त्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पुढे आलेल्या रोहितला बाद करण्यासाठी गौथमने चेंडू वाईडच्या दिशेने टाकला, रोहितनेही त्याचे फुटबॉल स्किल दाखवताना पायाने तो चेंडू अडवला. मुंबईने 10 षटकांत एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या. पण पुढच्याच षटकात रोहित बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला जोस बटलरकरवी झेलबाद केले. रोहितने 32 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 47 धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही फार काही करता आले नाही. धवल कुलकर्णीने त्याचा त्रिफळा उडवला. मुंबई इंडियन्सने 15 षटकांत 2 बाद 126 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईची धावगती काहीशी संथ झाली. आर्चरने 17 व्या षटकात कायरॉन पोलार्डला बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला. पोलार्ड अवघ्या 6 धावांवर माघारी परतला. 19व्या षटकात डी कॉक बाद झाला. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 81 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स ः 20 षटकांत 5 बाद 187 (रोहित शर्मा 47, डी कॉक 81, सूर्यकुमार यादव 16, कायरॉन पोलार्ड 6, हार्दिक पांड्या नाबाद 28, इशान किशन 5. जोफ्रा आर्चर 39-3, धवल कुलकर्णी 38-1, जयदेव उनाडकट 36-1).
राजस्थान रॉयल्स ः 19.3 षटकांत 6 बाद 188 (अजिंक्‍य रहाणे 37, जोस बटलर 89, संजू सॅमसन 31, स्टीव्ह स्मिथ 12, श्रेयस गोपाल नाबाद 13. हार्दिक पांड्या 34-3, जसप्रित बुमराह 23-2, राहुल चहर 34-1)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)