#IPL2019 : दिल्लीला नमवून चेन्नई अंतिम फेरीत

विशाखापट्टनम  -फाफ ड्यु प्लेसिस, शेन वॉटसनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकांच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखुन पराभव करत आयपीएलच्या बाराव्या मोसमाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यावेळी नाणेफेके गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 147 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नईने हे आव्हान 19 षटकांत चार गडी गमावत 151 धावा करुन पुर्ण करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे.

148 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने दमदार सुरूवात केली. सलामीवीर फाफ ड्यु प्लेसिसने फटकेबाजी करत तर शेन वॉटसनने सावध खेळी करत धमाकेदार फलंदाजी करायला सुरूवात केली. यावेळी दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांची चौफेरी धुलाई करत 10 च्या सरासरीने धावा करायला सुरूवात केली. त्यामुळे चेन्नईने पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये बिनबाद 42 धावांची मजल मारली.

पॉवर प्ले नंतरही फाफ ड्यु प्लेसिसने आपली फटकेबाजी कायम ठेवली. यावेळी फाफने केवळ 38 चेंडूत आपले अर्धशतक पुर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर पुढच्याच चेंडूवर फाफ बाद झाल्याने चेन्नईला पहिला धक्‍का बसला. फाफ बाद झाल्यानंतर इतका वेळ सावध फलंदाजी करणाऱ्या शेन वॉटसनने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत केवळ 31 चेंडूत अर्धशतक झळकावले.

फाफप्रमाणे तोही अर्धशतकानंतरच्याच चेंडूवर बाद झाल्याने चेन्नईला दुसरा धक्‍का बसला. यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायडूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र रैना 13 धावा करुन परतल्या वर आलेला धोनी देखील 9 धावा करुन बाद झाल्यानंतर ब्राव्होने चौकार मारत चेन्नईच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

तत्पूर्वी, दिल्लीची सुरूवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉने केवळ 5 धावांची तर धवन 18 धावांची खेळी करुन परतल्याने दिल्लीची सहा षटकांत 2 बाद 41 धावाच झाल्या होत्या. यानंतर फटकेबाजी करत धावगती वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणारा कॉलिन मुन्‍रो देखील 27 धावांची खेळी करुन परतला.

यानंतर आलेल्या पंतला साथीत घेत कर्णधार अय्यरने सावध खेळ करायला सुरुवात केली. मात्र अय्यरदेखील केवळ 13 धावा करून परतल्याने दिल्लीचा संघ अडचणीत आला असताना आलेला अक्षर पटेलही केवळ 3 धावा करून परतल्याने दिल्लीचा निम्मा संघ केवळ 80 धावांमध्येच तंबूत परतला.

यानंतर आलेल्या शेरफाने रुदरफोर्डला साथीत घेत पंतने दिल्लीचा डाव सावरायला सुरुवात केली दोघांनीही 16व्या षटकांत दिल्लीचे शतक फलकावर लगावले. मात्र,हरभजनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात शेरफाने रुदरफोर्ड 12 चेंडूत 10 धावा करून परतला. त्यामुळे दिल्लीला 102 धावांवर सहावा धक्‍का बसला.

यानंतर आलेल्या किमो पॉलच्या साथीत ऋषभ पंतने फटकेबाजी करायला सुरुवात करत दिल्लीची धावसंख्या वाढवली. यावेळी त्याने इम्रान ताहिरच्या षटकांत 1 षटकार आणि 1 चौकार लगावला. मात्र, पुढच्याच षटकांत ड्‌वेन ब्राव्होने टिच्चून मारा करत किमो पॉलला बाद करत दिल्लीला सातवा धक्‍का दिला. यावेळी पॉलने 3 धावा केल्या.

तर, अखेरचे दोन षटके राहिले असताना फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करणारा ऋषभ पंत देखील 25 चेंडूत 38 धावा करून परतल्याने दिल्लीच्या धावगतीला ब्रेक लागला. यानंतर ट्रेन्ट बोल्ट, अमित मिश्रा आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करत दिल्लीला 147 धावांची मजल मारून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.