मुंबई – भारतीय संघ तसेच आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरबद्दल न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू स्कॉट स्टायरीस यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शार्दुल एक उपयुक्त गोलंदाज असू शकतो. मात्र, त्याला अष्टपैलू म्हणू नका, असे स्टायरीस यांनी म्हटले आहे.
शार्दुलला हार्दिक पंड्याचा पर्याय बीसीसीआय मानते हेच हास्यस्पद आहे. पंड्याकडे अफाट गुणवत्ता आहे, त्यामानाने शार्दुल खूपच सामान्य वाटतो. त्याने आयपीएल स्पर्धेत काही चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र, तरीही त्याला आष्टपैलू म्हणता येणार नाही. अष्टपैलू क्रिकेटपटू जो असतो तो गोलंदाजीत आणि फलंदाजीत एकसारखीच गुणवत्ता सिद्ध करतो जशी पंड्या सातत्याने करत आहे, असेही स्टायरीस म्हणाले.
शार्दुलने कसोटी सामन्यांतही भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, त्याची पंड्याशी तुलना करणे योग्य नाही. त्याला जर भारतीय संघातील स्थान निश्चित व पक्के करायचे असेल तर त्याला पंड्याशीच स्पर्धा करावी लागेल व त्याच्यापेक्षा जास्त सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे जे वर्चस्व निर्माण झाले आहे ते पंड्यासारख्याच अन्य काही अष्टपैलु खेळाडूंमुळे. मात्र, त्यात शार्दुलचा उल्लेख करणे अयोग्य ठरेल, असेही ते म्हणाले.