मुंबई – आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. मात्र, सामन्यातील कामगिरीपेक्षा काही खेळाडूंच्या गैरवर्तनाचीच चर्चा जास्त रंगली होती. याला कारणीभूत ठरलेल्या सूर्यकुमार यादव व ह्रितिक शोकिन या मुंबईच्या तर कोलकाताचा कर्णधार नितिश राणा यांना सामनाधिकाऱ्यांनी वेगवेगळा दंड केला आहे.
मुंबईचा बदली कर्णधार असलेल्या सूर्यकुमारला वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत षटके वेळेत न टाकल्यामुळे दंड करण्यात आलेला सूर्यकुमार चौथा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी फाफ डुप्लेसी, संजू सॅमसन व हार्दिक पंड्या यांनाही 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला सामन्यादरम्यान मैदानावर आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल दंड करण्यात आला आहे. राणा व शोकीन यांच्यातील शाब्दीक चकमक थांबवण्याचा प्रयत्न अखेर सूर्यकुमार यादवने केला. त्याला आयपीएल आचार संहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 च्या भंगामुळे दोषी ठरवत सामना रकमेच्या 25 टक्के रकमेचा दंड केला आहे.
राणासह मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शोकीनलाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या सामना रकमेतून 10 टक्के रकमेची कपात केली गेली आहे. अर्थात हे दंड करण्यात आले असले तरीही सामना खेळण्याबाबत त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली नाही.