सातारा – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मू यांची खा. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मुर्मू यांना उदयनराजे यांनी सातारा भेटीचे आमंत्रण दिले. छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या ऐतिहासिक जिल्ह्याला अवश्य भेट देण्याची ग्वाही मुर्मू यांनी दिली.
भारताच्या राष्ट्रपतिपदी द्रौपदी मूर्मू यांच्या रूपाने प्रथमच आदिवासी महिलेची निवड झाली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना या पदासाठी उमेदवारी दिली. खा. उदयनराजे यांनी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
मुर्मू यांना उदयनराजेंनी साताऱ्याच्या इतिहासाची आणि सामाजिक वारशाची माहिती दिली. छत्रपती घराण्याचा इतिहास अनन्यसाधारण आहे. मुलींचे शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याला भेट देण्याचे आश्वासन मुर्मू यांनी दिले.