मुंबई – जागतिक बाजारातून सोमवारी संमिश्र संकेत आले. त्याचबरोबर सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भारतातील गुंतवणूकदारानी बरीच खरेदी केल्यामुळे सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 395 अंकांनी वाढून 52,880 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 112 अंकांनी वाढून 15,834 अंकांवर बंद झाला. याबाबत बोलताना रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, सध्या करोनाचे रुग्ण माफक प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती आणखी चांगली होईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेतील बेरोजगारीचा दर कमी होत असल्यामुळे अमेरिकेतील निर्देशांक वाढले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरझाला. ऊर्जा क्षेत्र वगळता क्षेत्र वगळता इतर क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
विविध राज्यातील निर्बंधांमुळे जून महिन्यातील सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर बराच परिणाम झाला असल्याचे दिसून आले. मात्र तरीही त्याकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. आता निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आगामी काळामध्ये गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे.