मुंबई – गेल्या दोन दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक (Stock market) बरेच वाढले होते. मात्र सोमवारी जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आहे. त्यामुळे धातू आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. त्यामुळे दोन दिवसानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 616 अंकांनी कमी होऊन 73,502 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 160 अंकांनी म्हणजे 0.72 टक्क्यांनी कोसळून 22,332 अंकावर बंद झाला.
पावर ग्रीड आणि टाटा स्टील कंपन्यांचे शेअर 2% पर्यंत कोसळले. एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्याचे शेअर घसरले. तर नेस्ले, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत.
अमेरिकेत व्याजदर कपात कधी होणार या संदर्भात बरेच संभ्रम निर्माण झाले आहेत. उद्या अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर जाणारा होणार आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात सावध वातावरणात विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतातही झाला. ते म्हणाले की, भारतातील छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झाल्याची चर्चा चालू आहे.
त्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. एकूण परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांचा सोने खरेदी कडे ओढा वाढला असल्याचे दिसून येते. आजच्या कामकाजात घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता भारतात खरेदी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 7,304 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली. अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढल्यानंतर हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतील असे समजले जाते.