नवी दिल्ली – सोमवारी सोन्याच्या दरात 69 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 46,408 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 251 रुपयांनी वाढून 69,835 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. या आठवड्यात डॉलर काही प्रमाणात कमकुवत झाल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे ते म्हणाले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,793 डॉलर तर चांदीचा दर 26.60 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानि यांनी सांगितले की जगभरात करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक वळत असल्याचे दिसून येत आहे.