गुंतवणूक करताय? मग ‘हे’ प्राथमिक नियम माहितीच हवे

1) आपल्या उत्पन्नाच्या किमान दहा टक्के रक्कम निवृत्तीसाठी योग्य आर्थिक पर्यायामध्ये गुंतवा. आपल्या आयुष्याच्या सुरवातीच्या काळापासून मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम जर निवृत्तीच्या गरजांसाठी गुंतवण्यास सुरवात केली तर निवृत्तीपर्यंत आवश्‍यक रक्कम निश्चित उभी राहू शकते. कमी महागाई दर आणि मोठी पेन्शन मिळण्याचे दिवस निघून गेले आहेत. वेळोवेळी आपल्या जीवनशैलीमध्ये कायम सुधारणा होत असतात. त्यासाठीचे खर्च वाढत असतात. भविष्यात महागाईसुद्धा वाढत जाणार आहे. या सर्वांचा विचार केला असता मासिक बचत दहा टक्‍क्‍यांवरून वीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केल्यास वाढलेल्या गरजांसाठी आवश्‍यक असणारी रक्कम उभारणे शक्‍य होते. भविष्यात येणारा वैद्यकीय खर्च वाढत जाणाऱ्या राहणीमानाचा खर्च बचत करण्यासाठी भाग पाडतात.

2) गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेऊ नका. जास्त परतावा कमावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कर्ज घेऊ नये. असे करत असताना उत्पन्नापेक्षा खर्च कायमच कमी असणे आवश्‍यक आहे. तरुण पिढी क्रेडिट कार्ड, मोबाईल पेमेंट यासारख्या साधनांचा वापर वेगवेगळ्या पेमेंटसाठी करत असतात. अनेक वेळा महिनाभरात क्रेडिट कार्डवर खरेदी केली आहे याचा आकडा मासिक उत्पन्नाच्या पुढे निघून गेला आहे याचेही भान रहात नाही. आपल्या उत्पन्नाचा आकडा कायम लक्षात ठेवून गरजेपुरतेच खर्च केल्यास आर्थिक चणचण भासत नाही.

3) गुंतवणूक करताना 120 ही मॅजिक फिगर गृहित धरून त्यामधून तुमचे वय वजा या सूत्रानुसार गुंतवणूक करा. वैद्यकीय सेवांमुळे सामान्य माणसाचे आयुर्मान वाढत आहे. जीवनशैलीत सातत्याने सुधारणा होत आहे. यामुळे भविष्यातील खर्चही वाढत आहेत. त्यामुळे 120 ही मॅजिक फिगर निश्चित केल्यास त्यामधून तुमचे वय वजा करा व उरलेली रक्कम शेअर बाजारात दीर्घकाळासाठी (किमान पाच ते दहा वर्षे) गुंतवा. म्हणजेच तुमचे वय चाळीस असेल तर 120 वजा 40 म्हणजेच 80 टक्के रक्कम तुम्ही शेअरमध्ये गुंतवू शकता. याचा थेट परिणाम भविष्यातील संपत्तीनिर्मितीवर होणार आहे.

4) अकस्मित येणाऱ्या खर्चासाठी किमान नऊ महिन्याच्या मासिक उत्पन्नाएवढी बचत बाजूला ठेवा. अकस्मात येणारे खर्च प्रामुख्याने वैद्यकीय गरजांसाठी निर्माण होत असतात किंवा अचानक येणाऱ्या आर्थिक खर्चांमधून निर्माण होत असतात. अशा खर्चांसाठी पहिली पायरी म्हणजे तीन ते सहा महिन्यांच्या मासिक खर्चांइतपत रक्कम म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडांमध्ये गुंतवावी. सद्य परिस्थिती लक्षात घेता ह्या अकस्मित येणाऱ्या गरजांसाठीचा हा फंड किमान नऊ महिन्यांच्या मासिक उत्पन्नाएवढा केल्यास अचानक येणारे खर्च व सध्याच्या परिस्थितीत नोकरी जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडू शकते.

5) आयुर्विमा आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या पंधरा ते वीस पट असायला हवा. जर गुंतवणूकदाराचे वय 40 पेक्षा कमी असेल तर निश्चितच आयुर्विमा वार्षिक उत्पन्नाच्या 15 ते 20 पट घ्या. याचवेळी आवश्‍यक असणारा आरोग्य विमा देखील आपल्या कुटुंबासाठी आवश्‍यक आहे. आयुर्विमा घेतानाही गुंतवणूकदाराने शुद्ध विमा (टर्म प्लॅन) घ्यावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.