अयोध्या जमीन घोटाळ्याची सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा : प्रियांका गांधी

नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या जमीन व्यवहारातील घोटाळ्याची सुप्रिम कोर्टाच्या देखरेखेखाली चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.

फेसबुकवर या संबंधात जारी केलेल्या एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोट्यवधी भारतीयांनी अयोध्येतील मंदिराविषयी आस्था दाखवली असून, असंख्य भाविकांची त्या पवित्र स्थळावर श्रद्धा आहे. या श्रद्धेवर आणि आस्थेवर घाला घालण्याचे काम या गैरव्यवहारामुळे झाले आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हे पंतप्रधान मोदींनीच स्थापन केले असून, त्यावर मोदींच्या जवळचीच माणसे नेमण्यात आली आहेत. प्रभू रामचंद्राच्या नावासाठी भक्‍तांनी श्रद्धेने जो निधी दिला आहे, त्यातील एका पैशाचीही चोरी होता कामा नये याची दक्षता मोदींनीच घ्यायला पाहिजे होती. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसारच ही ट्रस्ट नेमण्यात आली असल्याने तेथे जर काही घोटाळा झाला असल्याचा आरोप होत असेल तर त्याची सुप्रिम कोर्टाच्या देखरेखेखाली चौकशी झाली पाहिजे.

प्रियांकांनी म्हटले आहे की, 18 मार्च 2021 ला अयोध्येतील ही जागा काही मध्यस्थांनी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आणि त्यानंतर पाचच मिनिटांमध्ये ही जमीन राम मंदिर ट्रस्टला साडेअठरा कोटी रुपयांना विकली गेली. ही जमीन मंदिराच्या उभारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीपैकी नाही.

प्रत्यक्ष मंदिरापासून ती दूर आहे, असेही त्यांनी निदर्शनाला आणले आहे. ज्या अल्पावधीत या जागेची किंमत वाढली आहे त्याचा हिशेब केल्यानंतर दर सेकंदाला साडेपाच लाख रुपये या दराने त्या जमिनीचा भाव वाढलेला दिसतो आहे, असेही प्रियांकांनी म्हटले आहे.

या बाबीवर कोणाचा तरी विश्‍वास बसेल का? असा सवाल करून प्रियांकांनी म्हटले आहे की, लोकांनी मंदिराच्या उभारणीसाठी हे पैसे दिले आहेत, त्यांचा असा विश्‍वासघात होणे गैर आहे. त्यांनी म्हटले आहे की, या व्यवहारातील खरेदीच्या दस्तावर आणि विक्रीच्या दस्तावर दोन्ही ठिकाणचे साक्षीदारही सारखेच आहेत.

यातील एक साक्षीदार मंदिराचा ट्रस्टी असून, तो संघाचा उच्चस्तरीय पदाधिकारी आहे आणि दुसरा साक्षीदार भाजपचा नेता असून तो अयोध्येचा महापौरही आहे, याकडेही प्रियांकांनी लक्ष वेधले आहे. या जागेची किंमत वाढली असल्याने तितक्‍या मोठ्या रकमेला ही जमीन खरेदी केल्याचा दावा मंदिर ट्रस्टने केला आहे. त्यावर प्रियांकांनी म्हटले आहे की, तेथील सर्कलमधील जमिनीचे भाव लक्षात घेतले तर या जमिनीची जास्तीत जास्त किंमत पाच कोटी रुपये इतकी होते. तरीही या जमिनीसाठी ट्रस्टने तब्बल साडेअठरा कोटी रुपये मोजले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.