पुणे – अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्वत पूजेपासून, विविध ऑनलाईन सेमिनार, व्याख्याने, ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धा, पॉडकास्ट इत्यादी अभिनव कार्यक्रमांची रेलचेल यात असणार आहे.
महासंघाच्या 25 हून अधिक जिल्ह्यांतील जिल्हा संघटना, तसेच संलग्न गिर्यारोहण व साहसी संस्था यांच्याद्वारे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यातून पर्वतांचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा महासंघाचा मानस आहे.
विशेष बाब म्हणजे महासंघ या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाशी अधिकृतपणे संलग्न होऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे, या सर्वांची दखल व माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिली आहे.
2003 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात येतो. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दरवर्षी एक विषय ठरविला जातो व त्याला अनुसरून विविध कार्यक्रमांचे आयोजन जगभरात केले जाते. यावर्षीचा विषय हा डोंगर-पर्वतरांगा व तेथील जैवविविधता असा आहे.