पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या बदल्यांच सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी सहाय्यक आयुक्त, स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता आरोग्य विभागातील मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अशा 61 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी, कर्मचारी एकाच विभागात ठाण मांडून बसतात. त्यातून प्रशासकीय कामकाज सुरळीत होण्यास अडचण होत असते. दरवर्षी महापालिकेत मे अखेर विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र, महाविकास आघाडी सरकारने 30 जूनपर्यंत बदल्या न करण्याचे धोरण राबविले होते.
त्यानुसार महापालिका प्रशासनानेही बदल्या न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जुलै महिना उजाडताच महापालिकेत बदल्यांचे, खांदे पालटाचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी सहाय्यक आयुक्त, स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता आरोग्य विभागातील मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अशा 61 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी दि. 25 जुलै रोजी रूजू व्हावे, असा आदेश आयुक्त पाटील यांनी दिला आहे.